अकोला,दि.14 : सूक्ष्म सिंचन योजनेत चालू वर्षासाठी तुषार संच व ठिबक संचासाठी महाडीबीटी शेतकरी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. जिल्ह्यात गतवर्षी 1 लाख 34 हजार 267 हे. कपाशी पीकाची पेरणी झाली होती. यापैकी बहुतेक क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर व कोरडवाहू आहे. कपाशी पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्यास पिकाची वाढ होत नाही. पाण्याच्या कमतरतेने फुले गळतात. बोंडे कमी प्रमाणात येतात, तसेच त्यांचे वजन कमी भरते. त्यामुळे पेरणी, मशागत आदी बाबी वेळेवर व चांगल्या प्रकारे केल्या तरी वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट होते.
पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्यास किंवा झाल्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने तंतोतंत वापर होऊन पिकाला वेळेवर पाणी मिळते व उत्पन्नात वाढ होते. यंदाच्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचनाखाली आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (प्रति थेंब अधिक पीक) 55 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत 25 टक्के असे एकूण 80 टक्के अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, बहु भूधारक शेतक-यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 45 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत 30 टक्के असे एकूण 75 टक्के अनुदान मिळते.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 55 टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 45 टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत 45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in अर्ज करावा, तसेच तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.