अकोला,दि.11: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरून नजिकच्या ‘आयटीआय’ मध्ये जाऊन 30 जूनपूर्वी अर्ज निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ‘ आयटीआय ’ मध्ये कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
अर्ज निश्चितीनंतर उमेदवारांना प्रवेशासाठी व्यवसायनिहाय संस्थेचे पर्याय भरता येणार आहेत. प्रवेशासाठी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सूचना, माहिती व वेळापत्रक उपलब्ध आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी दि. 4 जुलै रोजी प्रसिध्द होणार असून अंतिम गुणवत्ता यादी दि. 7 जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या पर्यायानुसार व गुणवत्तेनुसार निवड यादी दि. 14 जुलैला प्रसिध्द होऊन, दि. 15 जुलै पासून प्रत्यक्ष प्रवेश सुरु होतील. जिल्ह्यात एकूण 8 शासकीय व 4 खासगी आयटीआय असून त्यापैकी मनकर्णा प्लॉट येथील एक शासकीय संस्था ही फक्त मुली किंवा महिलांसाठी आहे. त्याद्वारे विविध व्यवसाय प्रशिक्षणातून मुलींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. रतनलाल प्लॉट येथील संस्थेत 23 व्यवसायात एकूण 848 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
अर्हताधारकांना विद्यावेतन
आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी योजनेचा लाभ मिळतो. त्यातून महिना ७ ते १० हजारापर्यत विद्यावेतन प्राप्त होऊ शकते. प्रशिक्षणादरम्यात अर्हताधारक प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिमहा ५०० रू. विद्यावेतनाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. रोजगाराभिमूख अभ्यासक्रमामुळे सध्याच्या काळात आयटीआयच्या प्रशिक्षणास मोठ्या प्रमाणावर पसंती प्राप्त असते. उमेदवारांनी ऐनवेळी प्रवेशाची संधी गमावल्याची निराशा टाळण्यासाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व नजिकच्या आयटीआयमध्ये भेट देऊन मार्गदर्शन प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रम : कारपेंटर, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्राफ्टसमन सिव्हील, ड्राफ्टसमन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशीअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फॅशन डिजाईन ॲण्ड टेक्नॉलॉजी, फिटर, इनफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेन्टनन्स, इंटेरिअर डिझाईन ॲण्ड डेकोरेशन, मशिनिस्ट, मासोन (बिल्डींग कन्सट्रक्टर) मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मशिन टुल मेंटेनन्स, मेकॅनिक मोटर व्हेईकल, पेंटर जनरल, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर , रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर टेक्निशिअन, स्युइंग टेक्नॉलॉजी, टुल ॲण्ड डायमेकर (डायस् ॲण्ड मोल्डस्), टर्नर, वेल्डर, वायरमन.