जळगाव : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सन 2023-24 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होती. जिल्हयात विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, गाव बैठका इ. च्या माध्यमातून बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुषंगाने सन 2024-25 प्रकल्पांतर्गत खरीप हंगामामध्ये जिल्हयात ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद व मूग या प्रमुख पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक यांच्या कार्यक्षेत्रात विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
जमीनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/ विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वताचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सन 2023-24 मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयाबीन पिकावर मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. सदर रोगांमुळे शेतक-यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरीता बीजप्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वत:कडील घरगुती वापरण्यात येणान्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रिया युक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य / विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
बीजप्रक्रिया करण्याचे फायदे
- बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते.
- जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणी पासून 30-35 दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
- कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते.
- जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात.
- उत्पादनात वाढ होते.
बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या इतर संरक्षण करणाऱ्या बाबी घालाव्यात. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किया यंत्राद्वारे सावलीत करावे. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवी मध्ये एकत्र मिसळून घ्यावे, रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नये. जैविक बीजप्रक्रिया ही रासायनिक बीजप्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये अडीच ते तीन तासाचे अंतर असावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे 3-4 तासाच्या आत पेरणी साठी वापरावे, बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी.