टी-20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना हाेणार आहे. संघाने सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे. भारतीय संघाचा एकमेव सराव सामना 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगला देशविरुद्ध होणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याही न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिकने इंस्टाग्रामवर सरावाचे फोटो शेअर केले आहेत. बुमराहने शेअर केलेल्या पोस्टमध्ये बुमराह स्वतः, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अष्टपैलू अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि फलंदाज सूर्यकुमार यादव दिसत आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हार्दिक व्यतिरिक्त शुभमन गिल, दुबे, द्रविड आणि अक्षर दिसत आहेत.
बुमराह 2016 आणि 2021 टी-20 विश्वचषक खेळला आहे. यामध्ये त्याने 10 सामन्यांमध्ये 11 बळी घेतले आहेत. 10 धावांत दोन बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल आणि गेल्या वर्षी झालेल्या वन-डे विश्वचषकात बुमराहने चमकदार कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये बुमराहने 13 सामन्यांमध्ये 16.80 च्या सरासरीने आणि 5/21 च्या सर्वोत्तम आकड्यांसह केवळ 6.48 च्या इकॉनॉमी रेटने 20 बळी घेतले. तो या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता.
हार्दिकचा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी
हार्दिकचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी या दाेन्ही आघाड्यांवर ताे अपयशी ठरला. हार्दिकने आयपीएलच्या 13 डावांमध्ये केवळ 216 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १४३.०४ होता. गोलंदाजीमध्येही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याने ११ विकेट घेतल्या.
विराट अजूनही मुंबईतच
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे विराट कोहली अजूनही मुंबईतच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी तो पत्नी अनुष्का शर्मा आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर गौरव कपूरसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला. त्याच्यासोबत झहीर खान आणि सागरिका घाटगेही दिसले. त्याचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एलिमिनेटरमध्ये बाहेर पडला असला तरी, कोहली 25 जून रोजी पहिल्या बॅचसह न्यूयॉर्कला रवाना झाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो गुरुवारी रवाना होऊ शकतो. मात्र, तो बांगलादेशविरुद्धचा सराव सामना खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.
5 जूनला भारताचा पहिला सामना
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध न्यू यॉर्कमधील स्टेडियमवर हाेणार. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 9 जून रोजी होणार आहे. संघ अ गटात स्पर्धेतील सह-यजमान अमेरिका (१२ जून) आणि कॅनडा (१५ जून) विरुद्ध खेळेल. या स्पर्धेत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे लक्ष्य असेल. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपणार?
टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून, भारत 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक अंतिम फेरीत, 2015 आणि2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत, 2021 आणि 2023 मध्ये आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीत, 2014 मध्ये टी-20 विश्वचषक अंतिम फेरीत, 2014 मध्ये टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत भारतीय संघाने धडक मारली हाेती. मात्र प्रत्येकवेळी विजेतेपदापासून संघाला हुलकावणी मिळाली आहे.