अकोला,दि.20: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार व प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांच्या तपासण्या होत आहेत. आज पातूर रस्ता, बाळापुर रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. विनाहेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, अति वेगाने वाहन चालवणे आदींबाबत 35 हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनधारकांना समुपदेशनही करण्यात आले. अकोला शहरात शुक्रवारीही पातूर रस्ता, वाशिम बायपास, निमवाडी अशोक वाटिका चौक, बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसर, राधाकृष्ण प्लॉट परिसर, नेहरू उद्यान चौक, अशोक वाटिका उड्डाणपूल, गांधी रस्ता आदी ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 42 दोषी मोटर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.
रहदारीच्याविरुद्ध दिशेने वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, विमा अपडेट नसणे, रहदारीस अडथळा निर्माण करून धोकादायक पद्धतीने अवैध ठिकाणी वाहन पार्किंग करणे आदी बाबी आढळून आल्या.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मूर्तिजापूर बायपासवरील वर्तुळाकार सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने वाहने चालत असल्याने संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. ही त्रुटी लवकर दूर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महामार्ग बांधकाम यंत्रणेला दिले आहेत. जिल्हाधिका-यांनी गुरूवारी या स्थळाची पाहणीही केली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, सहायक मोटर वाहन निरीक्षक गजानन हरणे, दिनेश एकडे, मनोज शेळके आदी उपस्थित होते.