नेकनूर (जि.बीड): वीस वर्षांपासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली आहे. मांजरसुंबा-केज रस्त्यावर असलेली २० वर्षांपासूनची चमेली आणि उमरान बोरांची २०० झाडांची बाग यावर्षी पाणीटंचाईने वाळली आहेत. त्याचबरोबर ३ वर्षांपूर्वी लागवड केलेले दोनशे सीताफळांची झाडेही वाळली आहेत. शेतात बोअरवेल सुरु नसल्याने कंपनीने विमा उतरविला नाही, यामुळे एवढ्या मोठ्या झाडांचे नुकसान झाले आहे. फळबागा शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
फळबागा उभा करणाऱ्या शेतकऱ्यांना जाचक अटीने विम्याला मुकावे लागले. नोव्हेंबर, डिसेंबरच्या दिवाळी सुट्ट्यात केज रस्त्यावर असणाऱ्या सारूळ फाट्यानजीक असलेली बोरांची बाग लक्ष वेधून घेते. अनेक वाहने बोर खरेदीसाठी थांबलेली आढळतात. वीस वर्षांपासून जोपासलेली ही ढाकणे कुटुंबाची बाग यावर्षी पाणी नसल्याने होरपळून गेली आहे.
सारणीच्या तलावातून पाणी आणून ही बाग जोपासणाऱ्या अशोक शेषेराव ढाकणे (रा. सारुळ) यांनी ३ वर्षापूर्वी आणखी २०० सुपर गोल्ड सीताफळांच्या झाडांची बाग उभी केली. मात्र, ही बाग ही पाण्याअभावी होरपळली आहे. शेतात असणाऱ्या शेततळ्यात कापड खराब झाल्याने पाणी राहिले नाही. पाच एकरपेक्षा अधिक शेतातील फळबाग डोळ्यासमोर वाळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.