पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील काटवान भागातील अत्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बेहेड विठाई या परिसरातील शेतकरी विशाल दिलीप खैरनार यांनी साक्री येथील कृषी एजन्सीचे संचालक वाय. जी. मोरे यांच्या बेहेड शिवारातील गट नं. ३११ येथे दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी तब्बल ३.५ एकर क्षेत्रावर कलिंगडच्या तीन वानांची लागवड केली.
३.५ एकर क्षेत्रावर कलिंगडच्या तीन वानांची लागवडीमध्ये बाहुबली, जिग्ना गोल्ड व अजित सीड्सचे हायब्रिक्स या वाणांचा समावेश या शेतकऱ्याने केला. लागवडीनंतर केवळ एका महिन्यातच त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. विहिरींनी अशरक्ष: तळ गाठला. खोदण्यात आलेली बोअर देखील कोरडी झाली. मात्र कुठल्याही डिप्रेशनमध्ये न येता किंवा खचून न जाता त्यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीत कलिंगडाच्या पिकाला टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. एक ते दीड महिना टॅंकरने पाणी देणे सुरु ठेवणे ही बाब अतिशय चिंताजनक होती. तरीही त्यांनी सुमारे ३८० टँकर्सने पिकाला पाणी दिले. ही बाब कुठल्याही सामान्य शेतकऱ्यांसाठी आवाक्याबाहेर होती.
सातत्याने पिकाला पाणी देऊनही साडेतीन एकरच्या कलिंगडच्या प्लॉटला पाण्याची जास्त गरज असते. त्याप्रमाणे एवढे पाणी लागणे साहजिक होते. परंतु कलिंगडचा प्लॉट पाण्याअभावी सोडण्याची वेळ आली असतांनाही खैरनार यांनी उत्कृष्ट नियोजन करून व कृत्रिम पाणी व्यवस्थापन करून साडेतीन एकरामध्ये कलिंगडचे ८० टन उत्पादन मिळवले. हे परीश्रम घेतांना त्यांनी बाजारभावाची कुठलीही चिंता बाळगली नसल्याने त्यांना यशाचे फळ मिळाले. तब्बल सात ते आठ किलोचे एक फळ सरासरी पिकवण्यात त्यांना यश मिळाले आहे. या ८० टन उत्पादन केलेल्या मालाला त्यांना बाजारभावाप्रमाणे सरासरी केवळ १०.५ रुपये इतका भाव मिळाला. त्यात टँकरने पाणी टाकण्याचा खर्च दोन लाख रुपये होता तर औषधे आणि खते ही बियाणे सह तीन लाख रुपये खर्च करण्यात आला. सर्व उत्पानातून त्यांना एकूण उत्पन्न हे आठ लाख चाळीस हजार रुपयांचे मिळाले. त्यांना खर्च काढून एकरी एक लाख रुपये नफा मिळाला. पाण्याअभावी त्यांच्या उत्पादन खर्चात दोन लाख रुपयाचे पाणी लागल्यामुळे त्यांच्या निव्वळ नफ्यात दोन लाखाची घट झाली. हेच पाणी त्यांच्या विहिरीत राहिले असते तर त्यांना दोन लाख रुपये अधिक नफा मिळाला असता. त्यामुळे भविष्यात साक्री तालुक्यातील काठवान भागात शासनाने सिंचनाचे प्रश्न सोडवले पाहिजेत. तरच शेतकऱ्याला भविष्यात अच्छे दिन! बघायला मिळेल. शेतकऱ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेती करणे अतिशय जिकरीचे व संघर्षमय झालेले आहे. तरीही विशाल दिलीप खैरनार सारख्या मेहनती शेतकऱ्याने परिस्थितीवर मात करत पिकाला संजीवनी दिली आहे.