अकोला,दि.18 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, विद्यावेतन आदींसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. तसेच महाडीबीटी प्रणालीवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप)या योजनेअंतर्गत मागील वर्षाचे तुलनेत 23.66 टक्के विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी कमी केलेली आहे. महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटीकडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे आदी.बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.
मात्र सदर विलंबाची कारणे लक्षात घेता देखील सामाजिक नाय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक़्त केलेली आहे. सद्यस्थितीत सन 2023-24 करिता विविध स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता तसेच वरील अडचणीचा विचार करून राज्यशासनाच्या मान्यतेने प्रलंबित निकाली काढण्याकरिता व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्चाचे व नुतनीकरणाचे अर्ज निकाली काढण्याकरिता दि.30 एप्रिल, 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ प्रदान करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत देण्यात आलेल्या मुदतवाढीबाबत महाडीबीटी पोर्टलवरील होम पेजवर देखील सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त मुदतवाढ दिलेल्या कालावधीत सन 2023-24 व त्यापुर्वीचे प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यात यावेत. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायम स्वरूपी रद्द बातल होतील याची नोंद घेण्यात यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
या दरम्यान माहे मे व जून 2024 मध्ये महाडीबीटीच्या तांत्रिक कक्षास मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 संपन्न झाल्याने मोठ्या प्रमाणात तांत्रिक पूर्तता करवयाचे असल्याने (डेटा बॅकअप घेणे, केंद्र शासनाच्या एन.एस.पी.पोर्टल सोबत डेटा संलग्नीकृत करणे इ.) महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ऑनलाईन अर्जाची नोंदणी दि.01 जून, 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरील दि. 30 एप्रिल, 2024 पूर्वी शैक्षणिक वर्ष 2023-24 व त्यापूर्वीचे अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण पात्र प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत. दिलेल्या विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील याची नोंद घेण्यात यावी. असे आवाहन श्रीमती मंगला मून,सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,अकोला यांनी केले आहे.