पुणे : घरी न सांगता, रागाच्या भरात घराबाहेर पडलेली आणि पुणे रेल्वे स्थानकावर प्रशासनाला सापडलेल्या सुमारे 210 मुलांची घरवापसी या आर्थिक वर्षात करण्यात आली. या कामात रेल्वे प्रशासन, आरपीएफ, लोहमार्ग पोलिस, साथी चाइल्ड लाइनच्या प्रयत्नांतून यश मिळाले. या कामाला आता आणखी गती देण्यात येणार असून, पुणे रेल्वे स्थानकावर नव्याने चाइल्ड लाइनच्या कक्षाची स्थापना केली जाणार आहे.
हरवलेल्या मुलांना मदत करणार्या साथी संस्थेचा कक्ष रेल्वेकडून हलवण्यात आला होता. तसेच, या संस्थेचे कामदेखील बंद केले होते. त्यामुळे घरातून निघालेली अनेक मुले पालकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत. आता रेल्वेकडून पुण्यातील या संस्थेचे काम सुरू केले गेले आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये हरवलेल्या मुलांना पुन्हा आपल्या पालकांपर्यंत सुखरूपपणे पोहोचविता येणार आहे. या कक्षासाठी पुणे रेल्वे स्थानकावर नव्याने जागा निश्चित करण्यात आली आहे. येत्या एक ते दोन आठवड्यात साथी संस्थेचा कक्ष उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच साथी संस्थेची, रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी यांची रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्यासोबत बैठक झाली, त्या वेळी कक्ष उभारण्यासंदर्भात चर्चा झाली.
पारदर्शक कारभार ठेवा
रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मात्र, यापूर्वी हा उपक्रम राबविताना अनुचित घटना घडल्या आहेत. यापुढे या उपक्रमातील सर्व काम पारदर्शक आणि मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असावे, अशी मते रेल्वे तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत.
असे चालते ‘साथी’ चे काम
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत रेल्वेकडून हे काम केले जात आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस यांच्या मदतीने साथी संस्थेमार्फत काम केले जात आहे. साथीचे पुण्याचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर राजवीर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या टीममार्फत पुणे रेल्वे स्थानकावर तीन शिफ्टमध्ये गस्त घातली जाते. या वेळी रेल्वे डब्यांमध्ये, स्थानकावर घरातून निघून आलेला एखादा लहान मुलगा सापडल्यास, त्याला लोहमार्ग पोलिसांकडे नेण्यात येते.
तेथे आवश्यक ती कार्यवाही झाल्यावर मेडिकल तपासणी केली जाते. त्यानंतर त्या मुलाचे समुपदेशन केले जाते. या वेळी त्या मुलाकडून त्याच्या घरची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, त्याने पुन्हा अशी चूक करू नये, याकरिता समजावले जाते. चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या नियमावलीनुसार त्याला सरकारी शेल्टर होममध्ये ठेवले जाते. पालक सापडल्यावर आणि कागदपत्रांची तपासणी केल्यावर त्याला पालकांच्या स्वाधीन केले जाते.
मध्य रेल्वेची विभागनिहाय आकडेवारी (एप्रिल 2023 ते मार्च 2024)
- पुणे विभागाने 210 मुलांची सुटका केली
- मुंबई विभागाने 312 मुलांची घरवापसी केली
- भुसावळ विभागात सर्वाधिक 313 मुलांची सुटका केली
- नागपूर विभागाने 154 मुलांची सुटका केली
- सोलापूर विभागाने 75 मुलांची सुटका केली
- एकूण 1064 मुलांची आर्थिक वर्षात सुटका झाली