आज जवळपास सर्वच स्पर्धात्मक परीक्षेत सामान्यज्ञान हा महत्त्वाचा विषय आहे. परीक्षा असो किंवा मुलाखत असो सामान्यज्ञानाची परीक्षा घेतलीच जाते. ही चाचणी केवळ सरकारी नोकरीतच नाही तर खासगी कंपन्यातील नोकरीतही घेतली जाते. कर्मचारी निवड आयोगापासून ते लोकसेवा आयोगापर्यंतच्या परीक्षेत सामान्य ज्ञानावरच्या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले जाते. इतकेच काय तर ‘कौन बनेगा करोडपती’ सारखा कार्यक्रमदेखील सामान्यज्ञानावर आधारित आहे. अशा स्थितीत सामान्यज्ञानाची तयारी कशी करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो.
एक काळ होता की विद्यार्थी वर्तमानपत्र आणि मासिकाच्या मदतीने स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असत. आता काळ बदलला आहे. बहुतांश वर्तमानपत्रे आता स्थानिक बनल्याने देश-विदेशांतील बातम्यांना आता जागा कमी राहिली आहे. कधी कधी शिक्षणाच्या ठिकाणीही अनेक वर्तमानपत्रे येत नाहीत. याशिवाय स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता येईल, असा विश्वास निर्माण करणार्या वर्तमानपत्रांचा दर्जाही पूर्वीप्रमाणे दर्जा राहिला नाही. अर्थात, स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारावर आजही अनेक मासिके विश्लेषणात्मक माहिती देत असतात, मात्र बाजारात येईपर्यंत अनेक घटना घडून गेलेल्या असतात. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. जर त्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर स्पर्धात्मक परीक्षेत किंवा मुलाखतीत सामान्यज्ञानाच्या प्रश्नांना सहजपणे सामोरे जाऊ शकतील.
बातम्यांचे विश्लेषण पाहा
आजकाल बहुतांश वृत्तवाहिन्या मोठ्या किंवा ठळक घटनांवर चर्चा घडवून आणतात. त्यातील संतुलित बातम्या, विश्लेषण यावर लक्ष ठेवावे. यातील चर्चासत्रात तज्ज्ञांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी बीबीसी, सीएनएन यांसारख्या न्यूज चॅनलची मदत घ्यावी. या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ देश-विदेशातील बातम्या समजत नाही तर वैचारिक द़ृष्टिकोन विकसित होण्यासही हातभार लागतो.
बातम्यातील तथ्य गोळा करा
आजकाल चारही बाजूंनी माहितींचा भडिमार होताना आणि त्यातही बातम्या सतत अपडेट होत असताना त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी उचलावा. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवर न्यूजशी निगडित असलेले अॅप डाऊनलोड करावेत. न्यूज हंट, डेली हंट, गुगल न्यूज यांसारख्या अॅपशिवाय वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलचे अॅपही घ्यावेत. हे अॅप आपल्याला सतत न्यूज अलर्ट देत असतात. कालांतराने सविस्तरही बातम्याही उपलब्ध होत असतात. आपण या बातम्यांच्या आधारे दररोज नोटस् काढू शकतो.
ऑनलाईन वाचण्याची सवय वाढवा
आपल्या सामान्यज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी ऑनलाईन वाचनाची सवय वाढवावी. आजकाल सर्वच वर्तमानपत्राच्या ऑनलाईन अॅडिशन उपलब्ध आहेत. तसेच विविध साप्ताहिके, नियतकालिकेही ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसेच न्यूज चॅनलवरील जुन्या चर्चाही यूट्यूबच्या मदतीने पुन्हा पाहता येतात. याशिवाय अनेक पुस्तकांच्या पीडीएफ फाईलदेखील आहेत. त्याचे डाऊनलोडिंग करून वाचन करता येते. तसेच अनेक नामवंत कंपन्या ई-बुक देखील उपलब्ध करून देत असून त्या माध्यमातून आपण ज्ञानात भर घालू शकतो.
या सर्व माहितीतून नित्यनेमाने नोटस् काढाव्यात. यासाठी आपली स्वतंत्र शैली विकसित करावी. संकलित केलेल्या माहितीची वर्गवारी करण्यासाठी आकड्यांचा वा सांकेतिक शब्दांचा आधार घ्यावा. तसेच वाचलेल्या, नोटस् काढलेल्या माहितीवर चिंतन करून स्वतःची विश्लेषण शैली विकसित करावी.