सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज मंगळवारी (दि.१६ एप्रिल) सोने दराने नवे शिखर गाठले. आज शुद्ध सोन्याचा दर ७०१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७३,५१४ रुपयांवर गेला. चांदीचा दरही प्रति किलो ८३,४५२ रुपयांवरून ८३,६३२ रुपयांवर पोहोचला. इराण- इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असून एप्रिल महिन्यात आतापर्यंत सोने ४,५०० रुपयांनी महागले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७३,५१४ रुपये, २२ कॅरेट ६७,३३९ रुपये, १८ कॅरेट ५५,१३६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४३,००६ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८३,६३२ रुपयांवर खुला झाला.
सोने दरवाढीचे कारण काय?
इराण- इस्रायल संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक स्तरावरील मागणीदेखील सोन्याच्या दराचा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या चिंतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली आहे. परिणामी सोन्याच्या दरात मंगळवारी वाढ झाली, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?
सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते.