भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. यंदा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (Long Period Average -LPA) तुलनेत १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता (यात ५ टक्के कमी अथवा अधिक तफावत असू शकते) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशात एल निनोची परिस्थिती मध्यम आहे. नवीन मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (MMCFS) तसेच इतर हवामान मॉडेलचे अंदाज असे सूचित करतात की एल निनो स्थिती पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात तटस्थ एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) स्थितीत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. तर पावसाळ्याच्या उत्तरार्धात ला निना परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचरानन यांनी सोमवारी सांगितले की, “या वसंत ऋतूमध्ये उत्तर गोलार्धात बर्फाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी होते. याचा नैऋत्य मोसमी पावसाशी म्हणजेच मान्सूनशी उलट संबंध आहे. यामुळे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.”
ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान धुवांधार पाऊस
“१९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानच्या मान्सून काळात संपूर्ण देशातील दीर्घ कालावधीच्या पावसाची सरासरी ८७ सेमी राहिली आहे. भारतातील चांगल्या मान्सूनशी संबंधित असलेली ला निना परिस्थिती ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान विकसित होईल”, असेही त्यांनी सांगितले.
स्कायमेटचा काय सांगतो?
यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने नुकताच वर्तवला होता. मान्सून हंगाम १०२ टक्के (५ टक्के अधिक-वजा मार्जिन) असेल, असे म्हटले होते. सरासरीएवढा पाऊस पडणे म्हणजे पर्जन्यस्थिती चांगली असणे, असेच मानले जाते. हवामान विभागाकडूनही ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यानच्या पावसाला सरासरीएवढा अथवा समाधानकारक मानले जाते. असा पाऊस पिकांसाठी तसेच पाण्याच्या इतर गरजांसाठी उत्तम मानला जातो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी ८६८.६ मिमी राहील. महाराष्ट्रासह २३ राज्यांत चांगला पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले होते.
‘ला निना’ परतणार
गेल्या वर्षी पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे त्याचा मॉन्सूनवर परिणाम झाला. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच हिंवाळ्यातही उबदार वातावरण राहिले. पण आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून हंगामात ‘ला निना’ परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APCC) क्लायमेट सेंटरने या वर्षातील भारतातील पहिल्या मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. केंद्राने एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी दोन स्वतंत्र हवामान अंदाज जारी केले होते. या अंदाजानुसार, देशात जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या मान्सून हंगामात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या अंदाज बदलाचे श्रेय अलीकडील ENSO अलर्टला दिले जाते; जे एल निनो ते ला निना स्थितीत अंदाज व्यक्त करते.