दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (दि.१३) जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबादसह अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर १४ एप्रिल रोजी नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागाला यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात पुन्हा एकदा हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या तीन- चार दिवसापासून पूर्व, पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने येलो अलर्ट दिल्याने ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कोकणात (मुंबईसह) उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सियस आणि २३ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागातील तापमान ४० अंश सेल्सियसहून अधिक राहू शकते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पुढील ४ ते ५ दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत एक दिवस ऑरेंज तर चार दिवस येलो अलर्टचा इशारा दिला आहे. मागील तीन दिवसांपूर्वी ४२ अंशावरील तापमानात घट येऊन पावसाची रिपरिप सुरू आहे. गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळला. काल शुक्रवारीही येथे पाऊस झाला. आज शनिवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस जोरदार कोसळला. दरम्यान, वायव्य भारतात १३ ते १५ एप्रिलदरम्यान मध्यम ते तीव्र गडगडाटासह वादळे वारे वाहण्याची शक्यता आहे.