अकोला दि.4: निवडणूक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था आणि योग्य वातावरण राखतानाच, विविध उपक्रमांतून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी आज येथे दिले. अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक कामकाजाबाबत नियोजनभवन येथे आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण, निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी यंत्रणेकडून झालेली कार्यवाही, सर्व मतदान केंद्रांवरील सुविधा, विविध निगराणी पथके, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, सी-व्हिजील, प्राप्त तक्रारी, स्वीप उपक्रम आदी विविध बाबींचा आढावा सामान्य निरीक्षकांनी यावेळी घेतला.
श्री. जाडोन म्हणाले की, निवडणूक मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध प्रयत्न व्हावेत. शहरी भागात लक्ष केंद्रित करावे. गत निवडणूकीत ज्या बुथवर मतदानाचे प्रमाण कमी होते, अशी केंद्रे निवडून कमी मतदानाची कारणे शोधून काढावीत. त्यानुसार भरीव जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अभिनव उपक्रम हाती घ्यावेत.
ते पुढे म्हणाले की, सध्याचा उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा असणे आवश्यक आहे. विशेषत: आरोग्य पथके सुसज्ज असावीत. उष्माघातासारखे प्रकार घडू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणेने ‘अलर्ट मोड’वर राहावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे पालन होण्यासाठी सर्व पथकांनी समन्वय ठेवून काटेकोरपणे कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. परंडेकर यांनी सादरीकरण केले. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांचा संपर्क क्रमांक 8626058320 आणि दूरध्वनी क्रमांक (0724) 2991067 हा आहे. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांना निवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास ते शासकीय विश्रामगृह येथील गुलमोहर कक्ष येथे सकाळी ९ ते १० या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असतील.