मुंबई : भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्यांच्या तुलनेत शिक्षित तरुण बेरोजगार राहण्याची शक्यता जास्त आहे, असे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने (आयएलओ) अहवालात सांगितले आहे. भारतात पदवीधर तरुणांचा बेरोजगारीचा दर २९.१ टक्के तर कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्यांचा बेरोजगारी दर ३.४ टक्के आहे. म्हणजेच पदवीधरांचा बेरोजगारी दर तब्बल ९ पटींनी जास्त आहे. भारतातील बेरोजगारीवर तयार करण्यात आलेल्या ‘आयएलओ’च्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तर सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन घेतलेल्या तरुणाईचा बेरोजगारीचा दर १८.४ टक्के आहे.
अहवालात सांगितले आहे की, भारतीय तरुणाईत बेरोजगारी एक मोठी समस्या आहे. सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन घेतलेल्या तरुणाईत ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यात सातत्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. भारतीय बाजारपेठेत नवनवीन नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. परंतु, निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि मनुष्यबळाचे कौशल्य यात मोठी तफावत दिसून येते. तसेच ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर रघुराम रंजन यांनी अधोरेखीत केलेल्या, भारताच्या शालेय शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे, या मताचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. कृषिव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या नोकऱ्या तयार करण्यात भारतीय अर्थव्यवस्था अपयशी ठरली आहे. त्यामुळेही बेरोजगारीचा दर वाढला आहे.
चीनमध्ये वाढली बेरोजगारी
चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये चीनमध्ये १६ ते २४ वयोगटातील तरुणांचा बेरोजगारीचा दर १५.३ टक्क्यावर गेला आहे. शहरी लोकसंख्येत सुमारे ५.३ टक्के बेरोजगारी दिसून येते. त्याच्या तुलनेत हा दर तिपटीने जास्त आहे.
भारतातील बेरोजगारी घटली
भारतात २००० मध्ये १५ ते २९ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर ८८.६ टक्के होता. २०२२ मध्ये हा दर ८२.९ टक्क्यांवर आला आहे. याच कालावधीत शिक्षित तरुणांची संख्या ५४.२ टक्क्यावरुन ६५.७ टक्क्यांवर गेली आहे.
महिला जास्त बेरोजगार
महिलांना याचा मोठा फटका बसला आहे. ७६.७ टक्के शिक्षित महिला बेरोजगार आहेत. यातुलनेत पुरुष बेरोजगारांचे प्रमाण ६२.२ टक्के आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे.