टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी आपल्या दमदार फलंदाजीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहेच. त्याचबरोबर टीकाकारांनाही मौन राहण्यास भाग पाडले आहे. विराट कोहली दिवसेंदिवस नवनवीन विक्रम आपल्या नावावर करत आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून (आरसीबी) खेळताना तो सलामीवीर म्हणून संघाला दमदार सुरुवात करुन देत आहे. यामुळे त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदला गेला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे.
सर्वाधिकवेळा नाबाद राहणारा दुसरा सलामीवीर
विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद राहणारा दुसरा सलामीवीर ठरला आहे. शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील विराटचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. तो आयपीएलच्या सलामीवीर म्हणूनतब्बल १६ वेळा नाबाद राहिला आहे. अशी कामगिरी करत त्याने दिल्ली कॅपिटल्सचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. वॉर्नर हा सलामीवीर म्हणून त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 15 वेळा नाबाद राहिला आहे. वॉर्नरसोबतच या यादीत आरसीबीचा माजी सलामीवीर ख्रिस गेलही आहे. तोही १५ वेळा नाबाद राहिला आहे.
शिखर धवन अग्रस्थानी
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद राहणार्या सलामीवीरांमध्ये शिखर धवन अग्रस्थानी आहे. तो पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. सलामीवीर म्हणून तो 23 वेळा नाबाद राहिला आहे. विराटसमोर आता शिखर धवनचा विक्रम मोडित काढण्याचे लक्ष्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा खेळ पाहता तो शिखरचाही विक्रम मोडित काढेल, असे चाहते मानत आहेत.
आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहणारे सलामीवीर
- शिखर धवन २३
- विराट कोहली १६
- डेव्हिड वॉर्नर १५
- ख्रिस गेल १५
शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ५९ चेंडूत ८३ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांची आषजबाजी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी राखून जिंकला. आरसीबीचा या मोसमातील तीन सामन्यांतील दुसरा पराभव ठरला.
विराट ठरला ‘आरसीबी ’ साठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज
विराटने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चार षटकार ठोकले. IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. IPL मध्ये ख्रिस गेल (239) आणि एबी डिव्हिलियर्स (238) षटकार ठोकले होते. आता विराटच्या नावावर 241 षटकारांची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात केवळ सहा खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेत कोणत्याही एका संघासाठी 200 हून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत गेल, डिव्हिलियर्स, कोहली, किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे.
ऑरेंज कॅप पुन्हा मानकरी
शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराटने ८३ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत तो ऑरेंज कॅपचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या IPL 2मध्ये, कोहलीने तीन सामन्यांमध्ये 90.50 च्या शानदार सरासरीने 181 धावा केल्या आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने खेळलेल्या तीन डावांमध्ये त्याने 141.41 च्या एकूण स्ट्राइक रेटने 15 चौकार आणि सात षटकार फटकावले आहेत. ‘ऑरेंज कॅप’ ही आयपीएलच्या आघाडीच्या धावा करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. सध्या, विराट कोहली गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे,
IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये, हेनरिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने २ सामन्यात 143 धावा केल्या आहेत. रियान पराग नावावर दोन सामन्यांत १२७ धावा आहेत. त्याच्यापाठोपाठ संजू सॅमसन ९७ धावा (२ सामने) आणि अभिषेक शर्मा ९५ धावा (२ सामने) केल्या आहेत.