बुलडाणा : मालवाहू वाहन-ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 53 वरील तालसवाडा फाट्यानजीक (ता. मलकापूर) शुक्रवारी (दि. 8) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मालवाहू वाहनवाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे (वय 32, रा. पतखडी बेलदारवाडी, जळगाव), ट्रकचालक रघुवीर सिंह (वय 39, पाटणिया, मध्य प्रदेश), समाधान यमराज पवार (वय 38, रा. लव्हारा, ता. पाचोरा, जि. जळगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यातील पिलोरे व सिंह यांचा जागीच, तर पवार यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोर्याचे आयशर वाहन भुसावळमार्गे अकोल्याकडे निघाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रकशी त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन गंभीर जखमींना क्रेनने बाहेर काढून मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना बुलडाणा व जळगाव खानदेश येथे हलविण्यात आले. पैकी समाधान पवार यांचा बुलडाण्याला आणत असताना मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी रामलाल मीना (वय 48, रा. पाटणिया, मध्य प्रदेश) याला जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
एकतर्फी वाहतुकीमुळे वाढले अपघात
काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरील तालसवाडा ते दसरखेडदरम्यान वाहतूक एकतर्फी करण्यात आली असून, त्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. ती सुरळीत करण्यात पोलिसांचे दोन तास गेले.