डॉ.प्रिया पाटील : उन्हाळ्यात पाणी कमी प्रमाणात घेतल्यामुळे मूत्राशयाचे किंवा मूत्रखड्याचे विकाराचे प्रश्न प्रामुख्याने आढळतात, तसेच सिस्टायटिस (मूत्राशयाची जळजळ) याचेसुद्धा प्रमाण वाढते. सिस्टायटिस म्हणजे मूत्राशयाची जळजळ. सिस्टायटिसचे प्रमाण महिलांत जास्त प्रमाणात बघायला मिळते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाच्या लहान आकारामुळे जास्त संक्रमण होऊ शकते, तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ आणि साठून राहिलेल्या लघवीमुळे आणि मूत्राशयातील खडे यामुळेसुद्धा प्रमाण जास्त राहू शकते. त्याशिवाय स्त्री-पुरुष दोघांमध्ये मूत्राशयाचे खडे, मूत्राशयातील गाठ, लघवी मार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे ब्लॅडर वॉलमध्ये (मूत्राशयाच्या आवरणाला) सूज निर्माण होते. तसा हा गंभीर स्वरूपाचा आजार नाही; पण पाणी कमी प्यायल्याने संक्रमण होण्याचे प्रमाण वाढते व गर्भावस्थेतील महिलांमध्ये हे संक्रमणाचे प्रमाण बघायला मिळते.
सिस्टायटिसची लक्षणे
लघवी होताना जळजळ व तीव्र वेदना होणे. लघवी होताना किंवा लघवी झाल्यानंतरही वेदना राहू शकते. लघवीला वास येतो. तसेच लघवीवाटे रक्तही येते. ओटी पोटात दुखते, तसेच कंबरेच्या खालच्या भागात वेदना होऊन लघवीला सतत आल्यासारखे वाटते. तसेच वयस्कर लोकांमध्ये थकवा जाणवतो व ताप येतो. लघवीला आल्यासारखे वाटून लघवीला कमी होते तसेच वयस्कर लोकांमध्ये लघवीच्या जागी खाजही जाणवते.
खालील तपासण्या कराव्यात.
संपूर्ण रक्तगणना (सीबीसी टेस्ट) ब्लड शुगर मूत्राचे विश्लेषण, युरीन कल्चर, अल्ट्रासोनोग्राफी ओटीपोटाचा एक्स-रे यासारख्या इमेजिंग तपासण्या, सिस्ट्रोस्कोपी (कॅमेरा फिट केलेली ट्यूब वापरून मूत्राशय आतून बघणे) आणि मूत्र व्हाईडिंग तपासणी आदी.
जीवनशैलीत करावयाचे बदल
पाणी भरपूर पिणे. वैयक्तिक स्वच्छता ठेवणे. वयस्कर लोकांनी चॉकलेट, मसालेदार अन्न, तळलेले पदार्थांचे सेवन कमी करावे. सकाळी 40 मिनिटे चालणे ही दिनचर्या ठेवावी. बाथटबऐवजी शॉवरचा वापर हा संसर्ग कमी करू शकतो. संसर्ग टाळण्यासाठी विशेषतः स्त्रियांनी लघवी केल्यानंतर तो भाग पुसून कोरडा करावा. धूम्रपान, मद्यपान कमी करावे. लायकोपोडियम, सरसपैरिला, कॅथ्यारिस इत्यादी होमिओपॅथिक औषधे सिस्टायटिससाठी उपयोगी आहेत. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.