हिवरखेड : हिवरखेड तालुका निर्मिती प्रक्रियेला शासकीय स्तरावरून गती मिळाली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तेल्हारा व अकोट तहसीलदारांनी नागरिकांकडून आक्षेप हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात मागविल्या आहेत. सविस्तर असे की भौगोलिक रचना, लोकसंख्या, दळणवळणाची साधने, नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा इत्यादींची बचत व्हावी असे अनेक हेतू समोर ठेवून सन 2012 पासून हिवरखेड तालुका निर्मिती महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील एकूण दहा तालुक्यांचा समावेश होता. तर अकोला जिल्ह्यातील दोन नवीन तालुक्यांचा प्रस्ताव होता. यामध्ये हिवरखेड या नवीन तालुक्याचा समावेश असल्याने आता शासकीय स्तरावरून हिवरखेड तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळाली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोटच्या तहसीलदारांनी दि.5 मार्च पर्यंत आणि तेल्हारा तहसीलदारांनी 4 मार्चपर्यंत नागरिकांकडून आक्षेप व हरकती असल्यास लेखी स्वरूपात मागविले आहे. त्यानंतर कोणतेही आक्षेप व हरकती ऐकल्या जाणार नाहीत.
अनेक वर्षांपासून पाठपुरावा
हिवरखेड विकास मंच चे संयोजक सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड च्या पत्रकार बांधवांनी अनेक वर्षांपासून शासकीय स्तरावर पत्रव्यवहार, मंत्री महोदय व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने, तसेच माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करून,अनेक बातम्या प्रकाशित करून हा मुद्दा उचलून धरला आहे. हिवरखेड ग्रामपंचायतचे तत्कालीन ते आतापर्यंत चे सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि जागरूक नागरिकांनी मिळून ग्रामसभेचे ठराव सुद्धा पारित केलेले आहेत त्या सर्वांच्या मागणीला लवकरच यश मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत.
दोन आमदारांकडे मागणीमुळे डबल इंजिनचा वेग मिळेल का ?
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे या दोन्ही आमदारांकडे त्यांच्या समर्थकांनी व सर्वसामान्य नागरिकांनी हिवरखेड नवीन तालुका निर्मितीची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे जर दोन्ही आमदारांनी आपल्या पूर्ण क्षमतेने शासन दरबारी जोर लावला तर हिवरखेड नवीन तालुका निर्मिती डबल इंजिनच्या गतीने होईल असे जनतेला वाटते.