हिवरखेड : आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड आणि 50 च्या वर संलग्न खेड्यांच्या जवळपास एक ते दीड लक्ष लोकांच्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन बजेट अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये हिवरखेड येथे ग्रामीण रुग्णालयाचे मागणीसाठी विधिमंडळात आवाज बुलंद केला आहे.
अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर वाढता भार कमी व्हावा तसेच खेडेगावांना लागू असलेल्या तालुका स्तरावरील अथवा मोठे गाव असलेल्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असणे अत्यंत गरजेचे आहे त्यादृष्टीने हिवरखेड हे गाव अत्यंत मोठे असून हिवरखेड शहराला जवळपास 50 लहान मोठी गावे संलग्न असून या सर्व खेडेगावातील बहुतांश नागरिकांना मुख्य व्यापार पेठ व दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हिवरखेड गाठावे लागते. परंतु आरोग्य विषयक सुविधांचा विचार केला असता हिवरखेड येथे ग्रामीण रुग्णालय असल्याशिवाय आवश्यक आरोग्य सेवा मिळणे कठीण आहे. त्यासाठी नागरिकांना भटकंती करून तेल्हारा, अकोट, अथवा अकोल्याला जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून हिवरखेड येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे ही मागणी सातत्याने होत आहे. अनेक गावकऱ्यांनी यासाठी पाठपुरावा सुद्धा केला आहे. ग्रामपंचायत ग्रामसभांचे ठराव सुद्धा घेतलेले आहेत. परंतु राजकीय अनास्थांमुळे ही मागणी अद्यापही मंजूर होऊ शकलेली नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची मागणी पूर्ण होईल कधी असा प्रश्न जनतेला पडला होता.
हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रावर क्षमतेपेक्षा भरपूर बोजा असल्यामुळे येथील ओपीडीत दैनंदिन जवळपास 200 च्या वर रुग्ण येत असल्याची चर्चा आहे. सोबतच ज्या आवश्यक चाचण्या तपासण्या, रुग्णभरती इत्यादी जे प्राथमिक आरोग्य केंद्रात होऊ शकत नाही त्यासाठी ग्रामीण रुग्णालय असणे नितांत गरजेचे असल्यावरही मागणी पूर्णत्वास जात नसल्यामुळे जागरूक हिवरखेड वासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
हिवरखेड येथे शासनाने तात्काळ ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे. यासाठी आमदार अमोलदादा मिटकरी यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हिवरखेड चे जागरूक नागरिकांनी तसेच हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून करण्यात आली होती. यावेळी माजी सरपंच सुरेश ओंकारे, उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकार, अजय गावंडे, डॉ. निलेश पाटील, किरण विसपुते, धिरज बजाज, राहुल गिऱ्हे, अर्जुन खिरोडकार, उमर बेग मिर्झा, शाहरुख लाला, (सुदाम) सागर राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या मागणीची दखल घेऊन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राच्या बजेट अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यादरम्यान हिवरखेड येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी जोर लावून उचलून धरली. आमदार अमोल मिटकरी यांच्या विधीमंडळातील व मंत्रालयातील सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हिवरखेड नगरपरिषद झाली. आता त्यांनी विधिमंडळात आवाज उचलल्यामुळे ग्रामीण रुग्णालय पण होणार अशी जनतेला अपेक्षा आहे.