अकोला,दि.13: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि राज्य शासनाच्या योजनेत बांधकाम कामगारांसाठी इस्रायलमध्ये चांगल्या वेतनावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इस्त्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात 10 हजार पदांची मागणी आहे, असे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी सांगितले.
फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन आदी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या व्यक्तीना इस्रायलमध्ये इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन प्राप्त होऊ शकेल. या पदासाठी 21 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी करार करणे अनिवार्य आहे. कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधावा. इच्छूक बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बिटोडे यांनी केले आहे.