सोलापूर : भक्कम परिपूर्ण विकासाने देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून आमच्या सरकारने बाहेर काढले आहे. ‘गरिबी हटाव’ ही फसवी घोषणा राहिलेली नाही, तर ही ‘मोदी गॅरंटी’ झाली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. येणार्या काळात देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी देशभरात घरोघरी रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील रे नगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी 15 हजार 24 घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, रे नगरचे प्रवर्तक, माजी आ. नरसय्या आडम उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सोलापुरातील रे नगरमधील या गृहप्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो. त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण करून घरांची किल्ली सुपूर्द करण्यासही मीच येणार असल्याची गॅरंटी दिली होती. तो शब्द मी पाळला. हीच ‘मोदी गॅरंटी’ असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टीका
काँग्रेससह इंडिया आघाडीवर मोदी यांनी आपल्या भाषणात जोरदार टीका केली. 2014 पूर्वी अविश्वासाचे सरकार होते. ‘गरिबी हटाव’ चा नाराच दिला जायचा. परंतु, गरिबी काही हटली नाही. कारण, गरिबांचे पैसे मध्येच हडप होत होते. पण त्यानंतर आमचे विश्वासाचे अन् गरिबांना समर्पित ‘गॅरंटी’ चे, जनतेचे सरकार सत्तेवर आले. ‘गरिबी हटाव’ ची गॅरंटी आम्ही देत आहोत. आमच्या कार्यकाळात थेट गरिबांच्या खात्यावर शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळाली आहे, असे ते म्हणाले. आमच्या आजपर्यंतच्या सत्ता काळात गेल्या दहा वर्षांत गरिबांना पक्की घरे बांधून दिली. सोलापुरातील ही 30 हजार घरे आहेत. अशी आम्ही देशभरात चार लाखांहून अधिक घरे बांधून दिली आहेत. आमचे सरकार गरिबांसाठी समर्पित आहे. त्यानुसार आम्ही राबवत असलेल्या योजनांमुळे देशातील 25 कोटी नागरिक गरिबीच्या बाहेर आले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत 30 लाख कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आम्ही थेट मदत जमा केली. त्यामुळे काही जणांची मलई बंद झाली. मुलगी जन्मालाच आलेली नसताना तिला विधवा करून पैसे लाटले जायचे. ते आम्ही बंद केले. म्हणून ते ओरडताहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली.
फुले, आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायानुसार कारभाराची गॅरंटी
देशात दहा कोटी शौचालये, चार कोटी घरे, आरोग्यासाठी आयुष्मान भारत, देशभरात एकच रेशन कार्ड, बँकिंगशी जोडलेले 50 कोटी नागरिक, जनधन व पेन्शन अशा गरिबांसाठीच्या योजना आता यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. घर, पाणी, वीज, सामाजिक न्याय ही ‘मोदी गॅरंटी’ आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वानुसार सामाजिक न्याय देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कोरोना काळापासून देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात आहे, असेही ते म्हणाले.
सात प्रकल्पांना दोन हजार कोटी
पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास अन् मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वामुळे या राज्याचा विकास झाला आहे. या राज्यातील वेगवेगळ्या शहरांसाठी दोन हजार कोटींचे सात प्रकल्प सुरू आहेत. आमचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्त्वावर काम करीत आहे.
श्रीरामाच्या आदर्शानुसार मोदी सरकारचे कामकाज
अयोध्येत 22 जानेवारीला भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यासाठी नाशिकच्या पंचवटीतून अनुष्ठानाला सुरुवात केली आहे. श्रीरामाच्या आदर्शानुसार चालणारे आमचे सरकार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी संत कबीराच्या पंक्तीचा दाखला दिला.
प्राणप्रतिष्ठापना अन् लोकार्पण… ऐतिहासिक क्षण
श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना मुहूर्ताच्या सुरुवातीलाच लाखो कामगारांचा नव्या घरात प्रवेश होत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे, असे सांगून मोदींनी उपस्थितांना मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू करून रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. रामज्योतीने आपल्या जीवनातील गरिबीचा अंधकार, दारिद्य्र दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जनतेने आपापल्या मोबाईलच फ्लॅश लाईट सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक रे नगर घरकूल प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आ. नरसय्या आडम यांनी केले. त्यांनी सोलापूरसाठी विविध मागण्या आपल्या भाषणातून केल्या.
क्षणचित्रे…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल, सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांना मी वंदन करतो. तुम्हा सर्वांनी मी नमस्कार करतो, असे ते म्हणाले. ‘मोदी गॅरंटी’ या शब्दाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात अनेकदा उल्लेख केला. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसर्या टर्मची भाषणातून गॅरंटी दिली. ‘चाबी देने का वादा किया, चाबी देने आया, ये है मोदी की गॅरंटी’, असे पंतप्रधान मोदी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सभास्थळी पंतप्रधान मोदींचे आगमन होताच उपस्थित श्रोत्यांनी ‘जय श्रीराम’, ‘मोदी…मोदी… मोदी’ असा जयघोष सुरू केला. याप्रसंगी अमृत 2.0 योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळ दाबून केला. कधी हास्यविनोद, काँग्रेस-इंडिया आघाडीवर टीका, तर कधी भावुक होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 38 मिनिटांचे भाषण केले.