अयोध्येत प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाला आहे. ब्रह्म मुहूर्तापासूनच सर्व कामाला सुरुवात झाली. पुढील ७ दिवस येथे विधीनुसार पूजा केली जाणार आहे. रामललाच्या अभिषेकसाठी शिल्पकार योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या विधीला आजपासून सुरूवात झाली. २१ जानेवारीपर्यंत विविध अनुष्ठाने होणार आहेत. मूर्तीचे पूजन, जलवास, अन्नवास, शय्यावास, औषधीवास आणि फळवास असे विधी पार पडतील. आज रामलल्लाचा अभिषेक सुरू झाला असून ७ दिवस चालणार आहे.
रामलल्लाच्या मूर्तीची गुरुवारी गर्भगृहात स्थापना करण्यात येईल. निवड झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीचे वजन १५० किलोवर आहे. रामलल्लाची उभी मूर्ती बसवली जाईल. १८ जानेवारी रोजी गर्भगृहात मूर्ती स्थानापन्न केली जाईल. गेल्या ७० वर्षांपासून पूजली जात असलेली सध्याची मूर्तीही नवीन मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.
प्राण प्रतिष्ठामध्ये १२ अधिवास
- १६ जानेवारी – प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजा
- १७ जानेवारी – मूर्तिचा परिसरात प्रवेश
- १८ जानेवारी – तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास
- १९ जानेवारी – औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास
- २० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
- २१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास
सर्व भारतीय पंथांचे संत
शैव, वैष्णव, शीख, बौद्ध, जैन, कबीरमार्गी, इस्कॉनमार्गी, भारत सेवाश्रम संघमार्गी, रामकृष्ण मिशन, गायत्री परिवार, राधास्वामी, गुजरातचे स्वामी नारायण, वीर शैव लिंगायत संप्रदायातील मान्यवर संत सोहळ्याला उपस्थिती देतील, असे जन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्पष्ट केले.
भारतातील सर्व नद्यांच्या पाण्याने होणार अभिषेक
भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी अयोध्येत पोहोचले असून, रामलल्लाला अभिषेक या जलाने केला जाईल. नेपाळमधील रामाच्या सासुरवाडीतून (जनकपुरातून) तेसच आजोळ छत्तीसगडहून आलेल्या भेटवस्तू रामलल्लाला अर्पण केल्या जातील.
सायंकाळी दिवेलावणी
22 जानेवारीला संध्याकाळी 5.45 वाजता सूर्यास्त होईल. अयोध्येत यावेळी दिवे चेतविले जातील. देशभरातील लोकांनी यावेळी दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मिले सूर मेरा तुम्हारा…
उत्तर प्रदेशातील बासुरी, ढोलक, छत्तीसगडचा तंबुरा, बिहारचे पखवाज, दिल्लीची सनई, राजस्थानचा रावणहत्ता, श्री खोळ अशी अनेक प्रकारची वाद्ये पूजेदरम्यान वाजवली जातील.