अकोला, दि.15 : देशातील लोकजीवन व संपत्तीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने हवामानाबाबत पूर्वसूचना देण्याचे कार्य राष्ट्रीय हवामान विभाग दीडशे वर्षांपासून अविरतपणे करत आहे. काळानुरूप नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून विभाग अधिकाधिक सक्षम होत आहे, असे हवामान विभाग अधिकारी आर. के. कौशल यांनी आज सांगितले.
देशाच्या हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त येथील जिल्हा कार्यालयात आज कार्यक्रम घेण्यात आला. ‘बीएसएनएल’चे लेखाधिकारी राहूल पाटील, महसूल सहायक चंद्रशेखर वासनिक, आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संदीप साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हवामान विभाग दि. 15 जानेवारी 1875 पासून हवामानाचा अंदाज, धोके पूर्वसूचना, पाऊस व वा-याबाबत अनुमान आदी माहिती प्रसारित करत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने घडवलेले बदल आत्मसात करून विभागाने अद्ययावत अनुमान प्रणाली विकसित केल्या आहेत, असे श्री. कौशल यांनी सांगितले. श्री. पाटील, श्री. वासनिक, श्री. साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.