भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षांपूर्वी भारत ११ व्या क्रमांकावर होता. येत्या काही वर्षात भारताचा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१०) व्यक्त केला. गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या बंदर पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या नवीन गुंतवणुकीसाठी UAE मधील कंपन्यांकडून करार करण्यात आले आहेत. जग भारताकडे एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून पाहत आहे. एक विश्वासू मित्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारत लोककेंद्रित विकासावर विश्वास ठेवतो. ग्लोबल गुड, जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन, उपाय शोधण्याचे तंत्रज्ञान केंद्र, प्रतिभावान तरुणांचे पॉवर हाऊस आणि सदृढ लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. नुकतीच भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता भारत पुढील २५ वर्षांच्या लक्ष्यावर काम करत आहे. स्वातंत्र्याची १००वर्षे पूर्ण होईपर्यंत भारत विकसित देश बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे २५ वर्षांचा हा काळ भारताचा अमृत काळ आहे.
एस्टोनियाचे आर्थिक व्यवहार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री टिट रिसालो म्हणाले की, एस्टोनियन लोक तुमच्या आणि आमच्यासोबत ई-गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, हरित तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंवरील आमच्या सर्वोत्तम ज्ञानासाठी काम करण्यास तयार आहेत. राज्ये वाढली की भारत वाढतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या सगळ्यावर गुजरातसोबत काम करण्यात आम्हाला आनंद आहे.
एनव्हीडिया ग्लोबल फील्ड ऑपरेशन्सचे वरिष्ठ व्हीपी शंकर त्रिवेदी म्हणाले, “जनरेटिव्ह एआयमुळे आमची काम करण्याची पद्धत, व्यवसाय करण्याची पद्धत, शासन करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत बदलणार आहे. ज्याप्रमाणे इंटरनेट क्रांतीची सुरुवात 30 वर्षांपूर्वी झाली आणि २५ वर्षांपूर्वी मोबाइल क्रांती सुरू झाली, जनरेटिव्ह एआय क्रांतीही तेच करेल. जनरेटिव्ह AI तुम्हा सर्वांना प्रभावित करणार आहे.