हार्दिक पंड्या क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार? हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पुनरागमन करू शकतो, असे ‘बीसीसीआय’च्या एका अहवालातून समोर आले आहे. ‘आयसीसी’ वर्ल्डकपच्या ऐन मध्यावर जखमी होऊन स्पर्धेतून बाहेर पडलेला हार्दिक पंड्याचे पुनरागमन व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील असून, त्याच्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांनी दीर्घकालीन विचार करीत हार्दिकसाठी 18 आठवड्यांचा विशेष हाय परफॉर्मन्स प्रोग्राम तयार केला आहे. यातून ‘बीसीसीआय’ आपल्या खेळाडूंना किती जपते याचा परिपाठ त्यांनी जगातील इतर मंडळांसाठी घालून दिला आहे.
भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या पाठदुखीतून सावरून पुन्हा फॉर्मात आला होता; पण 2023 च्या विश्वचषकात बांगला देशविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली. यावेळी हार्दिक मैदानाबाहेर गेला होता, त्यानंतर तो अद्याप परतला नाही. त्याला वन-डे वर्ल्डकपमधून माघार घ्यावी लागलीच, शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा आदींनाही तो मुकला आहे. अशात त्याच्या पुनरागमनाची सर्वांनाच आतुरतेने प्रतीक्षा आहे. वर्ल्डकपमध्ये बांगला देशविरुद्धच्या सामन्यात पाय मुरगळण्याचे निमित्त झाले अन् हार्दिकला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
30 वर्षीय हार्दिकने पुनरागमन केल्यापासून उत्कृष्ट तंदुरुस्ती राखली आहे, ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे आणि पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावून दिले. ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक नुकताच गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. 2023 मध्ये हार्दिकने श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतही त्याचे खेळणे निश्चित नाही. त्यावेळी तंदुरुस्ती पाहून निर्णय घेतला जाईल. जून 2022 नंतर भारतीय संघाने 55 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आणि हार्दिक त्यापैकी 38 सामन्यांत होता. वन-डे क्रिकेटमध्ये या कालावधीत 50 पैकी 23 सामने तो खेळला.