नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात काल गावरान कांद्याची लाल कांद्यापेक्षा कमी आवक झाली. जादा आवक होऊनही लाल कांद्याला 4500 रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. अवकाळी पावसाने शेतकर्यांनी शेतात काढून ठेवलेल्या लाल कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांनी लाल कांदा लिलावासाठी पसंत केले. काल गुरुवारच्या लिलावासाठी लाल कांद्याची नेप्ती उपबाजारात58 हजार 273 गोण्या म्हणजे 32 हजार क्विंटल, तर गावरान कांद्याची23 हजार 371 गोण्यांमध्ये 12 हजार 854 क्विटल आवक झाली.
लाल कांद्याला 3650 ते 4500 रुपये विक्रमी भाव निघाला. दोन नंबरला 2400 ते 3600 रुपये, नंबर तीनला 1500 ते 2300 रुपये, तर लहान कांद्याची 700 रुपयांपासून पुढे विक्री झाली, असे समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. शेतकर्यांकडील गावरान कांदा आता संपत आला आहे. कालच्या लिलावासाठी जेमतेम आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला 3400 ते 4300 रुपये भाव मिळाला. नंबर दोनला2600 ते 3300 रुपये, तर नंबर तीनला 1600 ते 2500 रुपये, तर लहान कांद्याची 800 रुपयांच्या पुढे विक्री झाली. एकूण 400 ट्रक भरून कांदा आवक झाली.
शेतकर्यांना सुखद धक्का
सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने त्यात व्यत्यय आला असून, अचानक झालेल्या पावसाने काही शेतकर्यांचा कांदा भिजला, तर काहींनी प्लॅस्टिक कागदाखाली सुरक्षित ठेवला. यावर्षी लाल कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकर्यांना सुखद धक्का बसला आहे.