बुलढाणा: समृद्धी महामार्गावर टायरची हवा चेक करण्यासाठी थांबलेल्या एका खासगी बसला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या पाठीमागे उभा असलेला चालक आणि बसच्या मागील सीटवर बसलेला एक प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे ५.३० वा. सुमारास मेहकरजवळ हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपुरकडे जात असलेली खासगी बस (क्र.एमएच१४-एचजी ५९९९) चालकाने पहाटेच्या सुमारास टायरची हवा चेक करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबवली होती. मागच्या टायरची हवा चेक करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रक (क्र.डब्ल्यू बी२३, ई०८०३) ने बसला जोरदार धडक दिली. यात बसच्या मागे उभा असलेला चालक व बसच्या मागील सीटवरील एक प्रवासी जागीच ठार झाला. मागील सीटवरील अन्य दोन प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.