अकोला,दि.26: मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येते. संरक्षित सिंचनासाठी या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
शेतीला संरक्षित सिंचन मिळावे या उद्देशाने ही योजना राबवली जाते. अर्जदार शेतक-याकडे 0.20 हे. क्षेत्र असणे आवश्यक आहे. जमीन शेततळे खोदण्यास योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर योजनांतून शेततळ्यासाठी अनुदान घेतलेले नसावे.
योजनेत जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय तीन व कमीत कमी 15 बाय 15 बाय तीन मीटर अशा विविध आठ प्रकारच्या आकारमानाचे इनलेट व आऊटलेटसह व इनलेट आऊटलेटविरहित शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिमाणानुसार कमाल 75 हजार रू. अनुदान दिले जाते. इच्छूकांनी महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या ऑनलाईन नोंद करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.