अकोला,दि.१६ : रूग्णांना आवश्यक सर्व सुविधा मिळण्याच्या दृष्टीने नव्या शासकीय रूग्णालय सुसज्ज व अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा नियोजनभवनात बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अरविंद आडे आदी उपस्थित होते.
नवीन शासकीय रूग्णालयाची नियोजित कामे, त्यात अंतर्भूत बाबींची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी घेतली. ते म्हणाले की, नवे रूग्णालय सर्व सुविधांनी सुसज्ज व अद्ययावत असणे आवश्यक आहे. अपेक्षित विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पुरेशा मनुष्यबळासाठी कंत्राटी तत्वावरील भरतीप्रकिया राबवावी. रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील शिवापूर, अकोट येथील रूग्णालयांच्या कामांची सद्य:स्थिती आदींचाही त्यांनी आढावा घेतला. नियोजित कामांमध्ये ओपीडी व वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, पार्किंग इमारत, रस्ते, वसतिगृहे, निवासस्थाने आदी कामे नियोजित आहेत. त्यांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.