कोल्हापूर : भारत हा सर्वाधिक तरुणांची लोकसंख्या असलेला देश आहे. परंतु, या तरुणांमध्ये हदयरुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे एका आकडेवारीवरून दिसून येते. 2021 मध्ये भारतात झालेल्या 28 हजार 449 हृदयाशी संबंधित मृत्यूंपैकी 19 हजार 744 मृत्यू हे 30 ते 60 वयोगटातील आहेत. तरुण पिढीतील 1.8 कोटी हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी रोगामुळे होणार्या मृत्यूंपैकी किमान एक पंचमांश मृत्यू भारतातील आहेत.
चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, धूम्रपान, उच्च प्रदूषण पातळी आणि जलदगती सामाजिक दायित्वांमुळे आपल्या देशातील तरुणांमध्ये हेे आजार वाढले आहेत. भारतीयामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. पुरुषांमध्ये 50 टक्के हृदयविकाराचा झटका 50 वर्षांखालील आणि 25 टक्के पुरुषांना 40 वयाच्या आतच हृदयविकाराचा झटका येत आहे. हृदयविकारामुळे भारतीय महिलांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी हे रोग आहेत. हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी रोग (उतऊ) हा हृदय व रक्त वाहिन्यांच्या विकारांचा एक गट आहे, ज्यामध्ये कोरोनरी हृदयरोग, सेरेब्रोव्हस्कुलर रोग, परिधीय धमनी रोग, संधिवात हृदयरोग, जन्मजात हृदयरोग, खोल शिरा थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम यांचा समावेश आहे. कोरोनरी हृदयरोगाचा प्रसार भारतातील दर ग्रामीण लोकसंख्येमध्ये 1.6 टक्के ते 7.4 टक्के आणि शहरी लोकांमध्ये एक टक्क्यांवरून 13.2 टक्क्यांपर्यंत आहे.
मधुमेहामुळे सर्वाधिक धोका
इतर देशांच्या तुलनेत भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगितले जाते. असा अंदाज आहे की, भारतात 2019 मध्ये 7.7 कोटी मधुमेही रुग्ण आहेत. 2045 पर्यंत ही संख्या 13.5 कोटींहून वाढण्याची अपेक्षा आहे. यापैकी 57 टक्के मधुमेही रुग्णांचे निदान होत नाही.
इतर हृदयरोग टाळता येतील हृदयविकार टाळता येऊ शकतो. जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार आणि व्यायामामुळे रोगांवर नियंत्रण ठेवता येते. लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत, मिठाचा वापर वाढला आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब होतो. अशा लोकांना कोरोनरी रोग होण्याची शक्यता असते.