अकोला,दि.8: राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी उपक्रमात रोजगार मेळावा, प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन कार्यशाळा यांची सांगड घातल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. मेळाव्यांच्या माध्यमातून गत तीन महिन्यात सुमारे पावणेपाचशे व्यक्तींची विविध पदांवर निवड झाल्याने त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.
जिल्हा कौशल्य विकास विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने दर महिन्याला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यात नामांकित कंपन्यांत स्थानिक उमेदवारांना विविध पदांवर रोजगार मिळवून देण्यात येत आहे. त्यात आयोजित विविध मेळाव्यांमध्ये 477 व्यक्तींची विविध पदांसाठी निवड झाली.
शासन आपल्या दारी’उपक्रमात प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यक्रमांची जोड देऊन अधिक अंमलबजावणी अधिक व्यापक करण्यात आली आहे. कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यशाळा नुकतीच झाली. त्यात स्थानिक व्यापारी बांधव, निर्यातदारांना निर्यातवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज 2023’ राबविण्यात येत आहे. युवकांच्या संकल्पनांना मूर्त रूप मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.