भंडारा: एका इंस्टाग्रामवरील मित्राने आर्मीत असल्याचे भासवून, शहरातील तरुणीला तब्बल ५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन सोशल मीडियावरून अशा प्रकारे फसवणुक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात तरूणाविरोधी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होत असताना त्याबाबत वारंवार जनजागृती केली जाते. तरीसुद्धा अनेकजण त्याला बळी पडत आहेत. अशीच घटना शहरात घडली आहे. मूळची नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एका गावातील तरुणी भंडारा शहरातील राजगोपालचारी वॉर्डात भाड्याने राहते. २५ जुलै २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विकास जाधव नावाच्या (बनावट नाव) व्यक्तीने इंस्टाग्रामवर आयडी तयार करुन सदर तरुणीशी मैत्री केली.
संबंधित फसवणुक केलेल्या तरूणीला त्या तरुणीला आपण आर्मीत असल्याचे भासविले होते. त्यानंतर त्याने तरुणीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन संपर्क केला. त्यामुळे तरुणीचा त्या भामट्यावर विश्वास बसला. भामट्याने तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तो तिला विविध कारणांसाठी पैसे मागू लागला. तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसल्याने तिनेही टप्प्याटप्प्याने थोडथोडके नव्हे, तर तब्बल ५ लाख १३ हजार ५०० रुपये फोन पे द्वारे दिले.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने भंडारा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४१९, ४२०, सहकलम ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देशपांडे करीत आहेत.