अकोला, दि. 7: सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत असून मावा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूमुळे उद्भवतो. पांढरी माशी ही किड या रोगाचा प्रसार करते. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर आढळून येतो. मुग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इ. यजमान पिकांवर तो जिवंत राहू शकतो व सोयाबीन पिकावर संक्रमित होत राहतो.
रोगाची लक्षणे :
सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके /हलके चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडते. हरितद्रव्याचा ऱ्हास झाल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होतात व आकार लहान होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस – करपट रंगाचे ठिपके दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेंगा कमी प्रमाणात लागतात व त्यातील दाणे लहान राहतात. बहुतांश वेळी शेंगा दाणे विरहीत व पोचट राहिल्याने उत्पादनात लक्षणीय घट होते.
- निरोगी झाडावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भावीत पाने किंवा झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावेत.
- पिक तन मुक्त ठेवावे.
रोगवाहक किडींचे (पांढरी माशी व मावा) नियंत्रण-
- शेतामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे एकरी २५ या प्रमाणे पिकाच्या समउंचीवर लावावेत.
- निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरेक्टिन (३००० पी पी एम) १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
- थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा–सायलोथ्रिन ९.५० टक्के झेड सी २.५ मिली किंवा असिटामेप्रिड २५ टक्के + बायफेन्थ्रीन २५ टक्के डब्लू जी २.५ ग्रॅम किंवा बीटा सायफ्लुथ्रीन ८.४१ टक्के + इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.