अकोला, दि. 29 : भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रणाली आहे. निवडणूकांच्या माध्यमातून व मतदानाच्या राष्ट्रीय कार्यातून ही प्रणाली बळकट होत जाते. त्यामुळे नव्याने मतदानास पात्र झालेल्या सर्व तरूणांची मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक असून, त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, तसेच ‘स्वीप’ कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य, तसेच प्रतिनिधींची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी श्री. कुंभार बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार संतोष शिंदे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, तरूणवर्ग विविध बाबींविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत असतो. त्याचप्रमाणे निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातूनही व्यक्त होऊन मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवमतदारांची 100 टक्के नोंदणी जिल्ह्यात व्हावी. महाविद्यालयात शिबिरांच्या माध्यमातून ही नोंदणी पूर्ण केली जाईल. अर्हता दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा एकही विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित करावे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. परंडेकर यांनी मतदार सेवा पोर्टलची माहिती दिली. काही ठिकाणी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने नव्याने पात्र विद्यार्थ्यांचा समावेश झाल्यास त्याबाबत मतदार नोंदणी यंत्रणेला कळवावे. त्यांचीही नोंदणी करून घेण्यात येईल, असे श्री. परंडेकर यांनी सांगितले. श्री. महल्ले यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.