हिंगोली : दाेघांनी प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले. काही दिवसानंतर पत्नीची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल केले. ती गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मात्र आधारकार्डवरून पत्नी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी हट्टा पोलिसांनी पतीविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो ) कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वसमत तालुक्यातील आडगाव येथील मुंजाजी नागोराव गिणगिने (वय २२) हा पुण्यात नाेकरी करत होता. तेथे त्याचे नातेवाईक असलेल्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. घराच्यांचा लग्नाला विरोध होईल या भीतीने त्यांनी मार्च महिन्यात पुणे येथून थेट आडगाव गाठले. या ठिकाणी त्यांनी गुपचुप विवाह केला. काही दिवस आडगाव येथे राहिल्यानंतर दोघेही पुन्हा पुणे येथे कामाच्या निमित्ताने आले.
पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याने मुंजाजी याने उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी तपासणी केली असता पत्नी गर्भवती असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिच्या नोंदणीसाठी तिचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे रुग्णालयाने मागितली. त्यानंतर त्यांनी कागदपत्रे दाखवली. मात्र, यामध्ये मुंजाजी याची पत्नी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तिचे वय १७ वर्ष ५ महिने असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची माहिती पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांना देण्यात आली.
पोलीस पथकाने रुग्णालयात येऊन अल्पवयीन मुलीचा जबाव नोंदविला. त्यानंतर सर्व कागदपत्रे हट्टा पोलिसांकडे पाठविली. यावरून हट्टा पोलिसांनी मुंजाजी गिणगिने याच्या विरुध्द अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यांगर्तत गुन्हा दाखल केला आहे.