रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी ऑफलाइन मोडद्वारे कमी मूल्याच्या डिजिटल पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा प्रति ट्रान्झॅक्शन २०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवली. ही वाढीव व्यवहार मर्यादा तात्काळ लागू होईल, असे आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमकुवत असलेल्या अथवा उपलब्ध नसलेल्या भागात UPI Lite वॉलेटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ऑफलाइन पेमेंट व्यवहाराची मर्यादा सध्याच्या २०० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे.
UPI Lite हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI ने सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच केले होते. UPI Lite द्वारे व्यवहाराची मर्यादा २०० रुपये होती. आती ती ५०० रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे आता यूजर्संना यूपीआय पिनचा वापर न करता रिअल टाइममध्ये ५०० रुपयांपर्यंत रक्कम पेमेंट करता येणार आहे. गेल्या पतविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या या निर्णयांची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली होती. आता हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
UPI Lite म्हणजे काय?
UPI Lite हे ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ फिचर आहे ज्यामुळे यूजर्संना UPI पिन न वापरता रिअल टाइममध्ये कमी रक्कम पेमेंट करता येते.
UPI Lite चा वापर कसा करावा?
पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून अँपवर वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागतील. त्यानंतर तुम्ही ते प्री-लोडेड केलेले पैसे UPI Lite द्वारे वॉलेटमधून पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. ऑन-डिव्हाइस वॉलेटसाठी UPI Lite बॅलेन्ससाठी एकूण मर्यादा कोणत्याही वेळी २ हजार रुपये असेल.