अकोला,दि. 21: राज्यातील गोवंशीय पशुधनात लंपी आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात काही ठिकाणी पशुधनात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत. पशुपालकांनीही लसीकरण पूर्ण करून घ्यावे व आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन यंत्रणेने केले आहे.
जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार 271 गोवंशीय पशुधन आहे. त्यातील 1 लाख 16 हजार 385 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लंपी रोगाचा संसर्ग ‘कॅप्रिपॉक्स’ विषाणू मुळे होतो. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु देवी विषाणु गटाचे असतात. लंपीचा प्रसार जनावरांना डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यापासुन होतो.
गोवर्गीय सर्व वयाच्या जनावरांना हा आजार होऊ शकतो. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल गाठी येतात. जनावरे चारा कमी खातात अथवा बंद करतात. पाणी पिण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. बाधीत जनावरांना सुरुवातीस मध्यम स्वरुपाचा ताप येतो. डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव वाहतो, सर्व अंगावर गाठी येऊ लागतात. या गाठी विशेषत: डोके, मान, पाय व कासेत येतात. जनावरातील दूध उत्पादन क्षमता अत्यंत कमी होत जाते. काही जनावरांच्या पायावर सूज येते. जनावरांच्या फुप्फुस, श्वासनलिका, अन्न नलिकेवर मोठया प्रमाणात पुरळ येतात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधुन उपचार करावा. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरांस निरोगी जनावरांच्या कळपापासुन विलग ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरास गावातील चराऊ कुरणावर इतर निरोगी जनावरांसह सोडू नये. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने डास, माश्या, गोचि