तेल्हारा: तेल्हारा नगर परिषदेच्या निष्क्रिय व नियोजन शून्य कारभारामुळे दि १६ ऑगस्ट रोजी रात्री वैकुंठधाम स्मशानभूमीतील लाईट बंद असल्याने मृतकाचा अंतिम संस्कार अक्षरश: मोबाईल च्या व बाईकच्या हेडलाईट प्रकाशात उरकावा लागल्याने मृतकाच्या नातेवाईक तथा अंतयात्रेत सहभागी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शहरात सर्व सोयीसुविधासह एकमेव वैकुंठधाम स्मशानभूमी अस्तित्वात असली तरी तेल्हारा न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष,नियोजनशून्य कारभार व निष्क्रियता यामुळे स्मशानभूमीत मृत्यूनंतरही मृतकास मरणयातना भोगाव्या लागत आहेत व त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्मशानातील अस्वच्छता, ध्वनीक्षेपक नादुरुस्त असते रात्री प्रकाशाची सोय नसणे यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत १६ ऑगस्ट रोजी एका अंत्ययात्रा वैकुंठधामात आली असता विद्युत दिवे बंद असल्याने अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.वाढलेले गवत व झाडे झुडपे यामुळे सरपटणाऱ्या विषारी श्वापदांचे देखील भय नागरिकांना सतावत आहे सदर स्मशानभूमी दारुडे व अवैध धंद्याचा अड्डा बनल्याचेही चर्चा आहे. न.प. प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.