हिंगोली: जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु, मागील पंधरवाड्यापासून पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत. पिकांना वाचविण्यासाठी ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे. त्या शेतकर्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. परंतु कोरडवाहू शेतकर्यांच्या नजरा मात्र आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदा तब्बल एक महिना उशिराने पाऊस बरसला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. 1 ऑगस्टरोजी शेवटचा 10 मि.मि. पाऊस जिल्ह्यात झाला. आतापर्यंत 429.50 मि.मि. पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या 54 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी 15 ऑगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली होती. जवळपास यंदा 30 टक्के पावसाची तुट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील इसापूर, येलदरी व सिद्धेश्वर धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी पावसाने तब्बल 15 दिवस खंड दिल्याने पिकांची परिस्थिती नाजुक झाली आहे.
दररोज केवळ ढगाळ वातावरण राहत आहे. पाऊस मात्र पडत नसल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील मोठ्या धरणासह लघु बंधार्यातही अत्यल्प पाणीसाठा असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. अजून किमान दहा दिवस तरी पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याकडे व्यक्त केला जात असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील संपूर्ण पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या हिंगोली, वसमत, कळमनुरी या प्रमुख शहरांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सध्यातरी धरणामध्ये 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी कपात करण्यात आलेली नाही. पाऊसमान असेच राहिल्यास डिसेंबरनंतर तीनही शहरातील पाणी कपात होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात प्रमुख शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू नसले तरी काही गावात मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.