पिंपरी : विद्यार्थ्यांचा कल प्रामुख्याने आयटी क्षेत्राकडे असला तरीही अभियांत्रिकी क्षेत्रात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये देखील सध्या भरपूर नोकरीच्या संधी मिळत आहेत. वार्षिक साडेतीन लाखांपासून थेट दहा लाखांपेक्षा अधिक पॅकेजच्या संधीही अभियंत्यांना मिळत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व शाखांमध्ये सध्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आयटी क्षेत्रात चांगले पॅकेजेस मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा कल हा कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियरचे शिक्षण घेण्याकडे आहे.
आयटी क्षेत्रातील प्रॉडक्ट बनविणार्या कंपन्यांमध्ये चांगले वार्षिक पॅकेज मिळतात. त्या खालोखाल आयटी क्षेत्रातील विविध सेवा उद्योगांमध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, तेथे तुलनेत कमी पगार मिळतो. त्याशिवाय, उत्पादन निर्मिती करणार्या कंपन्यांमध्ये देखील भरपूर नोकरीच्या संधी मिळतात, अशी माहिती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांनी दिली.
आयटी क्षेत्रात स्थिरतेचा अभाव
आयटी क्षेत्रात आता पुर्वीसारखी स्थिरता राहिलेली नाही. मोठ्या-मोठ्या आयटी कंपन्यांनी नोकर कपात, पगार कपात असे धोरण अवलंबलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर, उत्तम करिअरचे आणखी काही चांगले पर्याय म्हणून मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनियर या शाखांकडे पाहिले जात आहे.
मॅकेनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये मुलींना वाव
मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इन्स्ट्रूमेंटेशन या टे्रेडमध्ये भरपूर नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महिलांसाठी वेगळा कोटा असतो. मात्र, या क्षेत्रात मुलींची संख्या कमी असल्याने हा कोटा पूर्ण करता येत नाही. त्यामुळे मुलींनी या शाखांचा विचार करायला हवा, असे मत डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे संचालक (सेंट्रल कार्पोरेट रिलेशन) धीरज आगरवाल यांनी दिली.
अभियांत्रिकीतील विविध करिअर पर्याय
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले वार्षिक पॅकेजेस (शैक्षणिक वर्ष 2022-23) डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी.
- 4 ते 6 लाख – 700 पेक्षा अधिक विद्यार्थी
- 6 ते 8 लाख – 200 पेक्षा अधिक विद्यार्थी
- 8 ते 10 लाख – 100 पेक्षा अधिक विद्यार्थी
- 10 लाखांपेक्षा अधिक – 75 पेक्षा अधिक विद्यार्थी
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (आकुर्डी) अंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मिळालेले पॅकेजेस
- 3.5 लाखांपेक्षा कमी- 97 3.5 ते 5 लाख – 432
- 5 ते 7 लाख -1057 7 लाखांपेक्षा अधिक- 584