अकोला,दि. 4 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविण्यात येत असून, पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. वैयक्तिक कर्ज बँक व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन राबविल्या जातात. त्याची माहिती महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना ऑफलाईन राबविल्या जात असून, त्याची अर्ज विक्री कार्यालयात आहे. हा अर्ज 10 रूपयांना मिळतो. थेट कर्ज योजनेचा अर्ज घेताना आधारकार्ड, जातीचा दाखला व शिधापत्रिका सोबत ठेवावी. अर्ज केवळ अर्जदाराला मिळेल. मध्यस्थामार्फत अर्ज विक्री व स्वीकृती होणार नाही. विक्री व्यवसायासंबंधी प्रशिक्षण घेतलेले, तसेच विधवा व निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येते, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी सांगितले.
महामंडळाचे कार्यालय गौरक्षण रस्त्यावर पॉवरहाऊससमोर वैष्णवी कॉम्प्लेक्समध्ये आहे. दूरध्वनी क्रमांक (0724) 2459937 असा आहे.