अकोला, दि. 28: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. सर्व महाविद्यालयांनी योजनेत पात्र विद्यार्थ्यांकडून विहित मुदतीत अर्ज भरून घ्यावेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल, असे जिल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.
या योजनेत चालू शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. तथापि, मागील वर्षी अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरण्यास दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षीय नुतनीकरणाचे अर्ज, तसेच सन 2021-22 या वर्षातील अर्ज रि-अल्पाय करता येणार आहेत. यानंतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही.
महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावेत व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.