अकोला, दि. 28: नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 28 ते 30 जुलैदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्प 75.85 टक्के भरलेला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी मोर्णा नदीत विसर्ग सोडला जाऊ शकतो. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात 71.42 जलसाठा झाला असून, आज दुपारनंतर वान नदीपात्रात 52.08 घ.मी. प्र. से. पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातून 13.57 घ. मी. प्र. से. यानुसार विसर्ग पूर्णा नदीत सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील इतर नदी-नाले, लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहेत.
ही स्थिती लक्षात घेता नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थिती पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडू नये. नदी-नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.