येत्या २ ते ३ तासांत मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. असे आयएमडीने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले असल्याची माहिती भारतीय हवामान विभाग पुणेचे विभागप्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
पुढचे २ ते ३ तासात मुंबईसह ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. काल (दि.२७ जुलै) हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीनमध्ये मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा येथील घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढचे काही दिवस महाराष्ट्रातील काही भागात सक्रिय राहणार आहे. पुढील 3-4 दिवसांत कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असे देखील मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीत सांगितले होते.