पुणे : राज्यात विविध जिल्ह्यात बालविवाह रोखण्याचे काम महिला आणि बालविकास विभागाने केले असून गेल्या पाच वर्षात तीन हजाराहून अधिक बालविवाह रोखण्यात त्यांना यश आले आहे. या कारवाईत 250 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात सर्वात अधिक बालविवाह होण्याचे प्रमाण सोलापूर, परभणी, कोल्हापूर या जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी महिला् आणि बालविकास विभागाने कंबर कसली असून, सन 2018 ते 2023 या पाच वर्षात राज्यातील 36 जिल्ह्यात कारवाई करून तीन हजारापेक्षा जास्त बालविवाह रोखण्याचे काम केले आहे. या कारवाईत 250 च्या आसपास बालविवाह लावल्याप्रकरणी नातेवाईक तसेच संबधित स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी शिक्षित आई-वडील आणि नातेवाईक यांच्या अज्ञानामुळे हे प्रमाण अजुनही कमी होत नाही. मुली जरी शिकत असल्या तरी आईवडीलांचे प्रबोधन आम्हाला करावे लागत आहे. त्यासाठी आणखी काही काळ प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलींवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध, पैसे नसल्यामुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर, मुलींची सुरक्षा अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढत असल्याचे आढळून आहे.
बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलिस, बलाकल्याण समिती, जिल्हा बालकल्याण अधिकारी कार्यरत असतात. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असेल तर त्याची माहिती संबधित ग्राम बाल संरक्षण समिती, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, चाईल्ड हेल्पलाईन, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत समजते. तसेच गुन्हे दाखल झालेल्या नातेवाईकांकडून पुन्हा गुन्हा करणार नसल्याचे बंधपत्र लिहून घेतले जाते.
वर्षनिहाय रोखलेले बालविवाह आणि दाखल केलेले गुन्हे
वर्ष रोखलेले बालविवाह गुन्हे दाखल
2018 187 10
2019 240 30
2020 519 45
2021 831 74
2022 930 71
- राज्यात सन 2018 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 37 बालविवाह रोखले तर पुणे जिल्ह्यात बालविवाहाचे सर्वाधिक 5 गुन्हे दाखल झाले आहेत.
- राज्यात सन 2019 मध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक 36 बालविवाह रोखले तर पुणे जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल झाले आहे.
- राज्यात 2020 साली सर्वाधिक 68 बालविवाह सोलापूर जिल्ह्यात रोखले तर याच जिल्ह्यात सर्वाधिक 5 गुन्हे दाखल केले आहेत.
- राज्यात 2021 या साली 70 बालविवाह सोलापूर जिल्ह्यात रोखले तर सर्वाधिक गुन्हे अमरावती जिल्ह्यात दाखल केले आहेत.
- राज्यात 2022 साली परभणी जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक 113 बालविवाह रोखले तर कोल्हापूर जिल्ह्यात 18 गुन्हे दाखल केले आहेत.