आजपासून पुढचे पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कोकण घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यांमध्ये १८-१९ जुलै या दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घाट भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के. एस. होशाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
होशाळीकर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, पालघर (१९ जुलै) रायगड (१८-१९ जुलै), पुणे (१८-१९ जुलै), सातारा (१९ जुलै) या जिल्ह्यांना आज आणि उद्या (१९ जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
अनेक राज्यांमध्ये मुसळधारेचा इशारा
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र,गोवा आणि ओडिशा या राज्यात देखील मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १९ जुलैपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड आणि मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
२१ जुलैपर्यंत मुसळधार
या आठवड्यात नैऋत्य मान्सूनचा आणखी एक टप्पा सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान वायव्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, पश्चिम चक्रावताची स्थिती आहे. यामुळे मध्य भारत आणि द्वीपकल्पीय प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने पूरग्रस्त हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.