निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२२’ अहवालात ७८.२० गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. तर, तामिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा अहवाल जारी केला. निर्देशांकाच्या तिसऱ्या आवृत्तीत चार प्रमुख व ११ उपमानकांच्या आधारे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या पाठोपाठ कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्लेषण या अहवालात आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्लेषण करणे, यासाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात येतो.
धोरण, व्यवसाय परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यातविषयक कामगिरी या चार मुख्य घटकांच्या संदर्भात निर्यातविषयक सज्जता निर्देशांकात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची क्रमवारी निश्चित केली जाते. या क्रमवारीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण, संस्थात्मक चौकट, व्यवसायाचे वातावरण, पायाभूत सुविधा, वाहतुकीची सुविधा, अर्थसहाय्य मिळण्याची सोय, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापारविषयक मदत, संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधा, निर्यातीचे वैविध्यीकरण आणि विकासाभिमुखता हा ११ उपनिर्देशक विचारात घेतले जातात.
‘ईपीआय २०२२’ च्या अहवालात महाराष्ट्राने सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात उत्तम कामगिरी बजावली आहे. बहुतांश किनारपट्टीय राज्यांनी चांगली कामगिरी केली असून, तमिळनाडू (८०.८९), कर्नाटक (७६.३६) आणि गुजरात (७३.२२) गुणांसह ही राज्ये देखील सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अग्रगण्य स्थानावर आहेत. अहवाचा उद्देश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण करणे आणि राज्यांमध्ये समतुल्य-शिक्षणाला प्रात्साहन देणे हा आहे.