अकोला, दि.17: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतक-यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने पीक विमा पाठशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यात 100 हून अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. योजनेच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र व पिकांसाठी शेतक-यांना केवळ एक रूपया भरून नोंदणी करता येते. या योजनेबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन, तसेच विमा योजना, पीक कर्ज आदींबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संध्या करवा, एचडीएफसी विमा कंपनीचे प्रतिनिधी सुनील भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.
विमा योजना, कृषी योजना आदींबाबत कार्यशाळेत शेतक-यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनीही संवाद साधला. विमा योजनेचा प्रचाररथ गावोगाव शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचून योजनेच्या माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे.
हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने केवळ एक रुपयात विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अरोरा यांनी केले. विमा नोंदणीसाठी शेतक-यांकडून जादा रक्कम घेणा-या सामूहिक सेवा केंद्रांविरुद्ध (सीएससी सेंटर) कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
योजनेत शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ एक रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण लागू आहे. शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. किरवे यांनी केले.