अकोला,दि.10 : कोषागारांतील कामे अधिक पारदर्शक व जलद होण्यासाठी कोषागार संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय कोषागारांसाठी ‘गेट पास मोड्युल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ येथे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांच्या हस्ते विविध कार्यालयाच्या संदेशवाहकांना डिजीटल पद्धतीची गेट पास देऊन झाला.
कोषागारातील कामे पारदर्शक व वेगाने व्हावे यासाठी ही डिजीटल सुविधा जिल्हा कोषागारात सुरु करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कोषागारांच्या कामकाजात पारदर्शकता येणार असून कामांना गती मिळेल. जिल्ह्यातील 190 आहरण संवितरण कार्यालये जिल्हा कोषागाराशी संलग्न आहेत. या कार्यालयांची विविध देयके, शासकीय प्रदाने कोषागाराच्या माध्यमातून दिली जातात. आतापर्यंत 150 आहरण संवितरण कार्यालयांच्या संदेशवाहकांना गेट पास देण्यात आले असून उर्वरित 40 कार्यालयांना गेट पास देण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती श्री. गोरेगावकर यांनी दिली.
सविस्तर नोंदींचा तपशील
गेट पासच्या या डिजीटल नमुन्यात आहरण संवितरण कार्यालयाची सविस्तर माहिती उपलब्ध होते. कोषागारांत कार्यालयांची देयके आदी कागदपत्रे सादर करणा-या संदेशवाहकांची माहिती, तसेच संदेशवाहक व आहरण संवितरण अधिकारी यांची डिजीटल सही आदी नोंदी या पासवर असतात. त्यामुळे देयक सादर करताना संदेशवाहक व आहरण संवितरण अधिकारी यांची सही, त्यांची माहिती तपासूनच पुढील कार्यवाही केली जाते. त्यानंतरच कोषागारासंदर्भातील देयके, प्रदाने स्विकारले जातात. ज्या आहरण संवितरण कार्यालयाने गेट पास जिल्हा कोषागार कार्यालयाकडून प्राप्त करुन घेतले नाही त्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रे सादर करुन गेट पास प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. गोरेगावकर यांनी केले आहे.